
मुंबईतील अनेक भागांत रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुग्णालयांमध्येही औषधे उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधे आणण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा सुधारा, आरोग्य यंत्रणा सक्षम करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी पालिका सभागृहात अर्थसंकल्पीय भाषणात केली.
अंकित प्रभू यांनी तब्बल तीन तास केलेल्या प्रदीर्घ भाषणात प्रशासनाच्या नाकर्तेपणावर आसूड ओढले. मुंबईतील खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त करीत पर्यावरण संवर्धनासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली. शहरातील पाणीपुरवठा आणि मलनिःसारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्यावर त्यांनी भर दिला. तसेच, महापालिका रुग्णालयांमधील औषधांचा तुटवडा आणि रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित करून आरोग्य विभागाने सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करावे, असे ठामपणे सांगितले. महापालिका शाळांच्या आधुनिकीकरणाचा मुद्दा मांडताना त्यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज व्यक्त केली, जेणेकरून पालिकेचे विद्यार्थी जागतिक स्तरावर सक्षम होतील. कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत केवळ ‘डम्पिंग ग्राउंड’वर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर प्रक्रिया करण्याचे तांत्रिक उपाय त्यांनी सुचवले. पर्यावरण संवर्धन, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका शाळांचे सक्षमीकरण आणि रेंगाळलेले प्रकल्प अशा विविध मुद्दय़ांवर प्रशासनाला धारेवर धरत मुंबईच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडाच प्रशासनासमोर मांडला.























































