
कर्नाटकात बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागांना सतर्क करण्यात आले आहे. बंगळूरुच्या बाहेरील हेसरघट्टाजवळील मुथूर गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूची लागण झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. १४ एप्रिल रोजी प्राथमिक चाचणीत संसर्गाची लक्षणे आढळल्यानंतर तात्काळ कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असून, आजूबाजूच्या परिसरात दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सर्व स्तरांवर देखरेख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बंगळूरुच्या वायव्येकडील मुथूर गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये अचानक कोंबड्या मरू लागल्या. त्यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. १४ एप्रिल रोजी झालेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये H5N1 विषाणूची पुष्टी झाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि पशुसंवर्धन, आरोग्य व जिल्हा प्रशासनाची पथके घटनास्थळी पाठवण्यात आली.
H5N1 विषाणूची पुष्टी झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून १६ एप्रिल रोजी ७ हजार ४४४ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पोल्ट्री फार्म आणि आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला असून, कडक जैवसुरक्षा नियमावली लागू करण्यात आली आहे. संसर्गाचा धोका लक्षात घेता, एका पोल्ट्री फार्मशी संबंधित १० कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

























































