मस्साजोग सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही; देशमुखांमध्ये थेट लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मस्साजोग (ता. केज) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने आता त्यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. त्यामुळे आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध निवडून देण्याचा विचार ग्रामस्थांतून केला जात होता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या विरोधात नऊ मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यात आणखी संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख, करुणा स्वरूपानंद देशमुख या तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत म्हणजेच १७ एप्रिलपर्यंत निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा होत्या. मात्र, इतर तिघांनी अर्ज मागे घेतले पण स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने आता ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अश्विनी देशमुख व स्वरूपानंद देशमुख यांच्यात ही लढत होत असून मतदार आता कोणाच्या बाजूने कौल देतात ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सरपंचपदाचा कार्यकाळ दीड वर्षाचा आहे. मतदार कोणाकडे सूत्रे देतात, हे निकलानंतर स्पष्ट होणार आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर न्याय मागण्यासाठी करण्यात आलेल्या पहिल्या आंदोलनापासून स्वरूपानंद देशमुख हे देशमुख कुटुंबासोबत सोबत होते. हे दोघे खास मित्र ही होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, तसे होताना दिसत नाही आता ही निकडणूक दोन देशमुखांमध्ये होणार हे निश्चित झाले आहे.