उष्णतेच्या लाटेतच वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरात उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. दुपारचे बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. राज्यातील अनेक जिह्यांतील तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडलेला असताना आता हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 20 ते 22 एप्रिल दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील काही जिह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाटय़ाचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. सध्या कोकण, विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. उष्णतेचा त्रास वाढलेला असताना सांगली जिह्यात शनिवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. उद्या 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खान्देश आणि दक्षिण मराठवाडय़ात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय, विदर्भातील यवतमाळ जिह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणचे तापमाण 43 अंशांपर्यंत पोहोचले आहे. तसेच रात्रीही प्रचंड उकाडा जाणवत आहे.