पत्नी कमावती असली तरी मुलाचा देखभाल खर्च पतीलाच द्यावा लागेल, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नी कमावती असली तरी मुलाचा देखभाल खर्च पतीलाच द्यावा लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

काम सांभाळून मुलाचे संगोपन करणाऱ्या महिलेचे मातृत्व पैशात मोजता येणार नाही. अशा प्रकरणात पती स्वतःची
जबाबदारी झटकू शकत नाही, असेही न्या. उर्मिला जोशी-फणसाळकर यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले. तसेच मुलाच्या देखभालीसाठी 15 हजारांऐवजी 30 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले.

कामाच्या दोन शिफ्ट 

कमावत्या महिलेला घरी आल्यावर मुलाचा सांभाळ करण्याचे काम करावे लागते. मुलाचा अभ्यास घेणे, त्याच्यावर संस्कार करणे, त्याला खाऊ घालणे यासह अनेक कामे ती करते. महिलेचे हे कर्तव्य पैशात मोजता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

शिक्षित बनवणे ही जबाबदारी 

आपला मुलगा शिक्षित व्हावा ही प्रत्येक वडिलांची इच्छा असते. त्यामुळे पतीने मुलाच्या सर्व खर्चाची जबाबदारी घ्यायलाच हवी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

बाळाला काही कमी पडता कामा नये 

पती-पत्नीच्या वादाचा फटका लहान बाळाला बसता कामा नये. आईकडे असणाऱया बाळाला कशाचीही कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्याला आर्थिक व मानसिक स्थैर्य मिळायला हवे. यासाठी बाळाच्या देखभालीकरिता पत्नीला पुरेसे पैसे मिळायलाच हवेत, असे न्यायालयाने नमूद केले.