
जागतिक मंचावर भारताचे स्थान कमालीचे डळमळीत झाले आहे. 140 कोटी लोकसंख्येचा भूभाग जागतिक नकाशावर शून्यवत ठरत आहे. अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. रुपया मृत झाला आहे. अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने देशाच्या भांडारातले 83 टन सोने विकले. एक दिवस देशही विकतील. देश रसातळाला जात आहे म्हणून ‘पहलगाम हल्ल्यातले मोबाईल चीनमधून आले’ अशा क्षुल्लक गोष्टीत आम्हाला शौर्य वाटत आहे. चीनचा हात पहलगाम हल्ल्यात आहे. इतके पुरावे असतील तर निदान चीनचा निषेध करण्याची हिंमत तरी आम्ही दाखवायला हवी. मात्र तसे काही घडले असे दिसले नाही. भारत जागतिक स्तरावर हा असा गोंधळल्यासारखा झाला आहे. हीच आपल्या देशाची सद्यस्थिती आहे.
राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने एक मोठा खुलासा केल्याचा दावा करण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी कश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यात 26 हिंदू पर्यटक मारले गेले. हल्लेखोर हवेसारखे फडफडत आले व हिंदू पर्यटकांची हत्या करून निघून गेले. या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी चकमकीत मारले गेले असे वारंवार सांगितले जात असले तरी हे सांगणे खरे वाटत नाही. आता एक खुलासा करण्यात आला आहे तो म्हणजे पहलगाम हल्ल्यातील मोबाईल चीनमधून पाकमार्गे दहशतवाद्यांपर्यंत पोहोचले. एजन्सीचे म्हणणे आहे की, कराची-लाहोरमार्गे हे फोन पोहोचले. या मोबाईल गॅजेटमध्ये बैसरन परिसराचे लोकेशन आणि महत्त्वाचे स्क्रीन शॉट आढळून आले. हा एक तपासाचा भाग झाला. त्यानुसार मोबाईल चीनमधून आले व ते फोन दहशतवाद्यांनी वापरले. प्रश्न असा आहे की, भारतात पन्नास-साठ टक्के डिजिटल व इलेक्ट्रॉनिक वस्तू चीनमधूनच येत आहेत आणि त्यात मोबाईल फोनचा समावेश आहे. मग गलवान हल्ला व पहलगामनंतरही भारताने चीनबरोबरचा व्यापार का थांबवला नाही? चीन जर पाकचा दहशतवाद आपल्या भूमीवर पोसत असेल व त्या दहशतवादापासून भारताला धोका असेल तर चिनी अर्थव्यवस्थेवर हल्ला करणे हे भारताचे कर्तव्य आहे, पण भारताने तसे काहीच केल्याचे दिसत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी यांनी जे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले त्या वेळीही भारताविरुद्ध लढण्यासाठी चीन पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात रसद पुरवत होता. त्यामुळे भारताचे नुकसान झाले. भारताला ‘ऑपरेशन सिंदूर’ गुंडाळावे लागले व
पहलगामचा बदला अर्धवट
राहिला. आता आपल्या लष्करप्रमुखांनी सांगितले की, ‘‘आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर-2’ साठी सज्ज आहोत.’’ ही अभिमानाचीच गोष्ट आहे, पण ‘ऑपरेशन सिंदूर-1’ चे काय झाले? ते पूर्ण झाले काय? लाहोर-कराची आणि पाकव्याप्त कश्मीरवर तिरंगा फडकवण्याच्या गर्जना तेव्हा भाजप नेते व त्यांचे सरकार करत होते त्या गर्जनांचे काय झाले? पाकपुरस्कृत दहशतवाद नेस्तनाबूत झाला काय? असे अनेक प्रश्न उत्तरांविना लटकत आहेत, की प. बंगाल व आसामची विधानसभा निवडणूक जिंकल्याने सीमापारचा दहशतवाद, घुसखोरीचा प्रश्न निकालात निघाला? भारत सरकारला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पहलगाम हल्ल्यात वापरलेले मोबाईल चीनमधून आले याचा तरी जाब केंद्र सरकारने चीन सरकारला विचारला काय? ‘ऑपरेशन सिंदूर’ गुंडाळल्यानंतर प्रे. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांना ‘डिनर’साठी ‘व्हाईट हाऊस’मध्ये खास निमंत्रित केले. त्यांच्या लष्करी नेतृत्वाचे व भारताविरुद्ध गाजवलेल्या शौर्याचे कौतुक केले हेसुद्धा विसरता येत नाही. पाकिस्तान हा ‘कंगाल’ देश आहे अशा बतावण्या आपण करत असलो तरी अमेरिका व चीन त्यांच्या फायद्यासाठी पाकला बळ देत आहेत आणि त्यात इराण, तुर्कीसारख्या राष्ट्रांची भर पडली ही भारतासाठी डोकेदुखी आहे. सीमेवरील एकही राष्ट्र भारताचा मित्र राहिलेला नाही ही चिंतेची बाब आहे. नेपाळच्या पंतप्रधानांनी जाहीरपणे सांगितले की, भारताची मोठी भूमी नेपाळच्या ताब्यात आहे. म्हणजे आता नेपाळही भारताला जुमानत नाही व नेपाळ चीनच्याच कह्यात आहे. नेपाळ हे जगाच्या पाठीवरील
एकमेव हिंदू राष्ट्र असल्याचा
अभिमान सगळ्यांना होता. नेपाळ आता चीनच्या मार्गाने खूपच पुढे गेला, भारतापासून मनाने लांब पोहोचला आहे. याला जबाबदार कोण? पंडित नेहरूंच्या काळात भारतीय सीमेवरील सर्व राष्ट्रांशी उत्तम मैत्री व संवाद होता. तो आता राहिलेला नाही. इटली वगैरे देशांत पंतप्रधान जातात, पण सीमेवरील छोट्या देशांमध्ये जावे व त्यांचे मन जाणून घ्यावे असे पंतप्रधान मोदींना वाटत नाही. पहलगामसारख्या भयंकर हल्ल्यानंतर एकही राष्ट्र भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहिले नाही. दहशतवादाचा निषेध करणे वेगळे व अशा प्रसंगी ठामपणे पाठीशी उभे राहणे वेगळे. जसे इराणच्या मागे चीन, रशिया, येमेन, तुर्कस्तान उभे राहिले व पाकिस्तानच्या मागे चीनने ताकद लावली. भारतासाठी असे कोणते राष्ट्र उभे राहिले ते सांगता येत नाही. ‘पंचशील’ची सर्व तत्त्वे आपण संपवली. तटस्थतेचे धोरण आम्ही बाजूला सारले. मुळात जागतिक मंचावर भारताचे स्थान कमालीचे डळमळीत झाले आहे. 140 कोटी लोकसंख्येचा भूभाग जागतिक नकाशावर शून्यवत ठरत आहे. अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. रुपया मृत झाला आहे. अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने देशाच्या भांडारातले 83 टन सोने विकले. देशाला अंधारात ठेवून हे सर्व केले गेले. एक दिवस देशही विकतील. देश रसातळाला जात आहे म्हणून ‘पहलगाम हल्ल्यातले मोबाईल चीनमधून आले’ अशा क्षुल्लक गोष्टीत आम्हाला शौर्य वाटत आहे. चीनचा हात पहलगाम हल्ल्यात आहे. इतके पुरावे असतील तर निदान चीनचा निषेध करण्याची हिंमत तरी आम्ही दाखवायला हवी. मात्र तसे काही घडले असे दिसले नाही. भारत जागतिक स्तरावर हा असा गोंधळल्यासारखा झाला आहे. हीच आपल्या देशाची सद्यस्थिती आहे.































































