बेकायदेशीर इंधन तस्करी करणारी तीन जहाजे अद्यापही मुंबईच्या धक्क्याला, दिरंगाईबाबत हायकोर्टाची नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंधन तसेच बिटूमन (डांबर) तस्करीप्रकरणी कारवाई करण्यात आलेली तीन जहाजे अद्यापही मुंबईच्या समुद्रकिनाऱयावर उभी आहेत. आवश्यक त्या परवानग्या घेऊन ही जहाजे गुजरातच्या अलंग शिपयार्डकडे नेण्याचे आदेश देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने हायकोर्टाने आज नाराजी व्यक्त करत जहाजे सोडवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.

तटरक्षक दलाने ‘एमटी अस्फाल्ट स्टार’, ‘एमटी स्टेलर रुबी’ आणि ‘एमटी अल जाफझिया’ ही तीन जहाजे फेब्रुवारी महिन्यात अडवली होती. यलो गेट पोलिसांनी ती ताब्यात घेतली. ही जहाजे सोडून द्यावीत अशी मागणी करत जहाज मालकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती शाम चांडक आणि न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.न्यायालयाने गेल्या वेळी ‘अल जाफजिया’ ही बोट अलंग शिपयार्डकडे घेऊन जाण्यास परवानगी दिली. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या संबंधित विभागाकडून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र सरकारच्या वतीने ऍड. विक्रम परशुरामी यांनी कारवाई करण्यात आलेली तीन जहाजे अद्यापही मुंबईच्या समुद्रकिनाऱयावरच असल्याची माहिती न्यायालयाला दिली. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत उपस्थित वकिलांना जाब विचारला. ही जहाजे सोडण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. जहाजे हलवण्यापूर्वी याचिकाकर्त्याकडून आवश्यक असलेल्या पूर्ततेचा तपशील देण्यासाठी इंडियन कोस्ट गार्ड आणि डी. जी. शिपिंग यांना निर्देश देत न्यायालयाने सुनावणी 18 जूनपर्यंत तहकूब केली.

पोलीस ठाण्यात उपस्थित रहा

सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधी गोविंद थापा यांना तपासात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी 5 ते 10 जूनपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत यलो गेट पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.