
पैठणला बुधवारी रात्री अल्पवयीन मुलावर चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणानंतर आज शहरात मोठा तणाव निर्माण झाला. मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत पैठण पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. दरम्यान पोलिसांनी मुख्य हल्लेखोर विधिसंघर्षग्रस्त बालक व विकास पवार या दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी मिंधे गटाचा नगरसेवक ईश्वर दगडे फरार आहे. या तिघांविरोधात खून व अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण शहरातील तहसील कार्यालयाच्या मार्गावर असलेल्या रेणुका अपार्टमेंट (इंदिरानगर) येथे मंगळवारी रात्री ९ वाजता खुनाची घटना घडली. याबाबत देविदास शशिकांत आहिरे ४६ (रा. इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रात्री त्यांचा मुलगा अनमोल देवीदास अहिरे १७ (रा. इंदिरानगर, पैठण) हा तेथे उभा असताना अल्पवयीन असलेला मुख्य आरोपी तेथे आला. व जुन्या भांडणावरुन थेट चाकु काढून छाती व पोटावर वार केले. आरोपी विकास पाडुरंग पवार व या भागातील मिंधे गटाचा नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे यांनी प्रोत्साहन दिले.
फिर्यादी व आरोपी हे इंदिरानगर येथील एकाच गल्लीतील रहिवासी आहेत. आरोपींना फिर्यादीची जात माहीत असूनदेखील आरोपी क्रमांक एकने फिर्यादीस फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर मयत व साक्षीदार असलेल्या मयताची आई अनुसया अहिरे असे घटनास्थळी आल्यानंतर विकास पाडुरंग पवार व ईश्वर भाऊसाहेब दगडे या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ केली. असे या फिर्यादीत म्हटले आहे.
जातीयवादासह न. प. निवडणुकीचीही किनार!
खुनाची घटना काल घडली असली तरी आज त्याचे तणावपूर्ण पडसाद उमटले. आरोपी दोन नव्हे तर तीन आहेत. नगरसेवक ईश्वर दगडे यांच्यावरही गुन्हा दाखल करुन अटक करा. अशी मागणी करत सकाळी मयताच्या नातेवाईकांनी पैठण पोलीस ठाण्यात धडक दिली. प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. विशेष म्हणजे या प्रकरणात नगर परिषद निवडणूक व जातीयवादाची किनार दिसून आली. अखेर नगरसेवक ईश्वर दगडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून नगरसेवक ईश्वर दगडे फरार आहे. अशी माहिती फौजदार सुधीर वाहुळ यांनी दिली. या प्रकरणी डीवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव गोमारे हे पुढील तपास करीत आहेत.






























































