
तीव्र उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अखेर आनंदाची बातमी आहे. मान्सूनचे अखेर केरळममध्ये आगमन झाले असून पुढील 7 दिवस केरळममध्ये मुसळघार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून कोकणात धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून साधारणतः 1 जूनपर्यंत केरळममध्ये दाखल होतो, मात्र या वेळी तीन दिवस उशिरा मान्सूनचे आगमन झाले आहे.
आठवडाभरात मुंबई गाठणार
मान्सून दोन-तीन दिवसांत कोकणात दाखल होईल. त्यानंतर साधारणतः दोन दिवसांमध्ये मान्सून मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामीळनाडूचा उर्वरित भाग तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये दोन दिवसांमध्ये मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो.



























































