
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी राजेश एक्सपोर्ट्स प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सेबीने (SEBI) राजेश एक्सपोर्ट्स आणि त्याच्या प्रवर्तकांवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि निधीचा गैरवापर केल्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर खेरा यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पत्रकार परिषदेत बोलताना खेरा म्हणाले की, “देशातील जनता 15 लाख रुपये खात्यात येण्याची वाट पाहत राहिली, पण नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेल्या राजेशभाईंनी 15 लाख कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.” मेहुल चोकसी, विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी आणि आता राजेशभाई यांचा उल्लेख करत त्यांनी ही ‘भाऊबंधकी’ देशाला महागात पडत असल्याची टीका केली.
खेरा म्हणाले की, सेबीने राजेश एक्सपोर्ट्स आणि त्याच्या प्रवर्तकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक आणि निधीच्या अपहाराचे आरोप केले आहेत. मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यासाठी सेबीला तब्बल सात महिने लागल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर सेबीने आदेश जारी केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समधील व्यवहारांवर बंदी घालण्यात आली.
खेरा यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) गुंतवणुकीचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2016 मध्ये एलआयसीकडे राजेश एक्सपोर्ट्समधील 1.99 टक्के हिस्सा होता. मात्र 31 मार्च 2026 पर्यंत हा हिस्सा वाढून 10.80 टक्क्यांवर पोहोचला. एलआयसीबरोबरच मोठ्या संख्येने लहान गुंतवणूकदारांनीही या कंपनीत गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीच्या बाजारमूल्यात झालेल्या मोठ्या घसरणीकडे लक्ष वेधताना खेरा म्हणाले की, फेब्रुवारी 2023 मध्ये राजेश एक्सपोर्ट्सचे बाजारमूल्य सुमारे 28 हजार कोटी रुपये होते. मात्र 5 जून 2026 रोजी ते घसरून केवळ 3 हजार कोटी रुपयांवर आले आहे.
या घडामोडींमुळे देशातील गुंतवणूकदारांचे सुमारे 25 हजार कोटी रुपये बुडाल्याचा दावा करत खेरा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच नियामक यंत्रणांनी वेळेत कारवाई का केली नाही, याचाही खुलासा सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली.


























































