23 वर्षांचा संघर्ष संपला; कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, हिंदुस्थानी वंशाच्या महिलेला मिळाले 85 कोटी रुपये; नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या ब्रिटनमधील एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि ऐतिहासिक घटस्फोटाच्या खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. हिंदुस्थानी वंशाच्या वर्षा गोहिल यांनी पती भद्रेश गोहिल यांच्याविरोधात तब्बल 23 वर्षे कायदेशीर लढा देत 66 लाख पाउंड म्हणजेच सुमारे 85 कोटी रुपयांची पोटगी मिळवली आहे. 2002 मध्ये जेव्हा त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हा वर्षा यांना केवळ 2.70 लाख पाउंड (सुमारे 3.5 कोटी रुपये) आणि एक कार देऊन हे प्रकरण संपवण्यात आले होते. मात्र, पतीने आपल्या मालमत्तेची खरी माहिती लपवली असल्याचा संशय वर्षा यांना सुरुवातीपासूनच होता.

वर्षा गोहिल यांच्या संशयाला वर्षानुवर्षे कोणताही पुरावा नव्हता. परंतु, नायजेरियाच्या एका माजी गव्हर्नरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जेव्हा भद्रेश गोहिल याचे नाव समोर आले, तेव्हा संपूर्ण चित्रच बदलले. भद्रेशने परदेशातील बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यासाठी 2011 मध्ये त्याला 10 वर्षांची कोठडी झाली. या फौजदारी कारवाई दरम्यान, भद्रेशने मूळ घटस्फोटाच्या वेळी लपवून ठेवलेली कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता आणि वेगवेगळ्या देशांतील कंपन्यांचे जाळे समोर आले. यामुळे वर्षा यांना त्यांचा जुना खटला पुन्हा जिवंत करण्यासाठी बळ मिळाले. NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

हे प्रकरण पुढे ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. 2015 मध्ये न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत स्पष्ट केले की, मालमत्ता लपवणाऱ्या जोडीदाराला त्याचा फायदा घेता येणार नाही, आणि वर्षा यांना खटला पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली. जप्त केलेली मालमत्ता ही गुन्ह्यातून कमावलेली आहे की कायदेशीर, यावर प्रदीर्घ वाद झाला. अखेर हायकोर्टाचे न्यायमूर्ती विल्यम्स यांनी भद्रेशला ‘पूर्णपणे खोट’ ठरवत, जप्त केलेल्या संपत्तीतील 66.6 लाख पाउंड हे कायदेशीर आणि वैवाहिक हक्काचे असल्याचे मान्य केले व ती रक्कम वर्षा यांना बहाल केली. नुकतेच ‘कोर्ट ऑफ अपील’ने यावर पुढील अपीलांचे सर्व दरवाजे बंद केल्यामुळे या ऐतिहासिक कायदेशीर लढाईवर अंतिम पडदा पडला आहे.