
अमेरिकेतील ओहायो राज्यातील टोलेडो शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘ओल्ड वेस्ट एंड फेस्टिव्हल’दरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. महोत्सवाच्या परिसरात अचानक झालेल्या गोळीबारामुळे उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच टोलेडो पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींची नेमकी संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणांचा आश्रय घेतला. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये लोक घाबरून पळताना दिसत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचाही शोध घेतला जात आहे. असे वृ्त्त टीव्ही 9 ने दिले आहे.
घटनेनंतर ओहायोचे गव्हर्नर माईक डिवाईन यांनी चिंता व्यक्त करत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित केली. स्थानिक प्रशासनानेही या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, घटनास्थळाजवळ उपस्थित असलेले अमेरिकन नौदलाचे माजी सैनिक केविन बेरी यांनी सांगितले की, गोळीबार सुरू होताच परिसरात घबराट पसरली. त्यांनी तत्काळ लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आणि जखमींना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या मते, घटनास्थळी किमान पाच जण गोळीबारात जखमी झालेले दिसले.
या घटनेमुळे टोलेडो शहरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली असून पोलिसांकडून संशयितांचा शोध वेगाने सुरू आहे.


























































