Iran Israel tension इराणकडून थेट इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला; इराक आणि सीरियाने हवाई क्षेत्र केले बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
iran-launches-direct-missile-attack-on-israel-iraq-syria-close-airspace-tensions-escalate

एप्रिलच्या सुरुवातीला लागू झालेल्या युद्धविरामानंतर इराणच्या लष्कराने इस्रायलला लक्ष्य करत पहिला क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे आखातातील तणाव वाढला असून पुन्हा एकदा युद्ध सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. इराणसोबतचे अमेरिका-इस्रायल युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या संभाव्य कराराच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याचे पाहायला मिळत आहे. इस्रायलने रविवारी कोणतीही पूर्वकल्पना न देता बैरुतच्या दक्षिण उपनगरांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा इराणने दिल्यानंतर हा हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने इस्रायलला कुरघोडी न करण्याची ताकिद दिली असताना देखील इस्रायलने हा हल्ला केला.

इराणने या हल्ल्याला दुजोरा दिला असून संभाव्य प्रत्युत्तराचा सामना करण्यासाठी आपले पश्चिमेकडील हवाई क्षेत्र बंद केले आहे. तर आखातातील इराक आणि सीरियानेही संभाव्य इस्रायली हल्ल्याच्या भीतीने आपली हवाई क्षेत्रे बंद केली आहेत.

‘जर हे हल्ले पुन्हा झाले, तर त्यावरील प्रत्युत्तर अधिक व्यापक असेल आणि त्यामध्ये संपूर्ण प्रदेशातील सर्व अमेरिकन आणि इस्रायली लक्ष्यांचा समावेश असेल,’ असे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने लेबनॉनमधील हल्ले आणि इराणचा किनारा तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील जहाजांवरील हल्ल्यांचा संदर्भ देत एका निवेदनात म्हटले आहे.

इस्रायलकडून प्रत्युत्तराची धमकी

इस्रायलमध्ये अनेक भागांत सायरन वाजल्यामुळे लाखो नागरिकांनी आश्रय घेण्यासाठी धाव घेतली. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की त्यांनी किमान तीन फेऱ्यांमधील क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली, तर उत्तर भागात अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. ‘सीएनएन’च्या (CNN) एका वृत्तानुसार, किमान १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच रोखण्यात आली.

इस्रायली लष्कराने सांगितले की या हल्ल्याला ‘शक्तीशाली’ प्रत्युत्तर देईल.

‘इराणने एक मोठी चूक केली आहे,’ असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रीन यांनी सांगितले. लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी सांगितले की, ‘आदेश मिळताच शत्रूवर पूर्ण ताकदीने हल्ला केला जाईल’.

ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा

परंतु इस्रायलचे सरकारी वृत्तवाहिनी ‘कान’ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना सांगितले आहे की इस्रायलने यापुढे कोणतीही कारवाई करण्याची गरज आहे असे त्यांना वाटत नाही.

अमेरिकन वृत्तसंस्था ‘अॅक्सिओस’ने (Axios) दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला उत्तर न देण्यास आणि डिप्लोमसीवर भर देण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वतः या फोन कॉलपूर्वी वृत्तसंस्थेला सांगितले होते की, ते नेतन्याहू यांना इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर न देण्याचे आवाहन करणार आहेत; इराणच्या मते हा हल्ला इस्रायलने बैरुतमध्ये केलेल्या हल्ल्याचा बदला होता.

अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘अॅक्सिओस’ला हेही सांगितले की ट्रम्प प्रशासनाने इस्रायलला बैरुतमध्ये हल्ला करण्यासाठी ‘हिरवा कंदील’ दिला नव्हता.