दोन वर्षापासून फरार असलेला गुंड सलमान अखेर जेरबंद, पोलिसांची चाहूल लागताच कपाटात लपला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांपासून पोलिसांना सतत चकवा देत फरार असलेला कल्याणमधील कुख्यात गुंड सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत बांधकामे उभारल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या डोलारेला स्थानिक पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. विशेष म्हणजे पोलिसांची चाहूल लागताच त्याने घरातील कपाटात लपून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.

सलमान डोलारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कल्याण परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. आरक्षित भूखंडांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रकल्प उभारण्यात आल्याप्रकरणी विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या फाईल्स चोरीला गेल्याची तक्रार महापालिकेकडून दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगानेही सलमानची झाडाझडती घेतली जाणार आहे. सलमान डोलारेविरोधात बाजारपेठ पोलीस ठाणे आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात मिळून एकूण 12 गुन्ह्यांची नोंद आहे.

‘खोटाल मंजिल’ला पोलिसांचा वेढा

सलमान डोलारे हा कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरातील खोटाल मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लपून बसला होता. याची खातरजमा केल्यानंतर कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फ्लॅटवर छापा टाकला. फ्लॅटची झडती सुरू असताना सलमान डोलारे घरातील कपाटामध्ये लपून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. सुरक्षेच्या कारणास्तव इमारत परिसराला पोलिसांनी वेढा दिला होता.