
देशात राजकारण म्हणजे स्वार्थाचा व्यापार झाला आहे. मतदारांनी एका चिन्हावर, पक्षाच्या भूमिकेवर मतदान करून निवडून द्यायचे व राजकारणातील स्वार्थी ‘वांग्यांनी’ लगेच स्वार्थापोटी त्या ताटातून दुसरीकडे उड्या मारायच्या. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ या गाण्याप्रमाणे वांगी व वांग्यांचे नेतेही टुणूक टुणूक चालत दिल्लीत जातात. तेथे त्यांची सालटी काढून त्यांना हवा तसा मीठ-मसाला, रंग फासून मोदी-शहांच्या किचनमध्ये लटकवून ठेवले जाते. द्राक्षाच्या अनेक जाती निर्माण झाल्या. आंब्याच्या जाती आहेत तशा वांग्याच्या जाती निर्माण झाल्या. त्यातली एक जात ‘सायोनी घोष’ वांगे! हे बियाणे ‘सायोनी सीडस्’ म्हणून प्रसिद्ध पावेल यात शंका नाही.
सायोनी घोष यांच्यासारख्या प्रवृत्तींचे काय करायचे? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ही सायोनी तिच्या धारदार भाषणांनी गाजली. ‘प्रतिममता’ अशी तिची प्रतिमा तयार झाली. प्रत्येक सभेत ती भाजपची लक्तरे काढत होती. ममता आपली माता असल्याचे सांगत होती. त्यामुळे तृणमूल काँगेस पक्षाच्या खासदारांत फूट पडत असताना त्या यादीत सायोनी घोष नसेल असे अनेकांचे मत पडले, पण ममतांच्या घराचे वासे फिरले असून सायोनी घोषने तृणमूल काँग्रेसचा, ममता मातेचा त्याग करून भाजपच्या तंबूत आपला घोडा घुसवला आहे. तृणमूलच्या ‘बेइमान’ खासदारांनी स्वतंत्र गट केला असला तरी आज-उद्या त्यांना भाजपमध्ये सामील व्हावे लागेल. सायोनी हा बंगाल निवडणुकीतला लोकप्रिय आणि चर्चित चेहरा होता. तिने ज्या प्रकारचा प्रचार केला, ‘त्यात दिल में काबा और मदिना’सारखी गाणी होती. या गाण्यावर भाजपचा आक्षेप होता व मुसलमानांना भुलवण्यासाठी सायोनी अशी गाणी गातेय अशी टीका भाजपने प्रचार काळात केली होती. तिच्या अशा गाण्यांमुळे हिंदुत्व धोक्यात आल्याचे भाजपने प्रचारात सांगितले होते, परंतु आता ‘दिल में काबा और मदिना’ हा विचार घेऊन सायोनी हिंदुत्ववाद्यांच्या तंबूत गेली. भाजपमध्ये जाऊन देखील सायोनी काबा, मदिनेवरील आपले प्रेम कायम ठेवेल आणि भाजपला काबा, मदिनेवर आक्षेप नसेल. जेव्हा आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टीचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा राघव यांनी केलेल्या बेइमानीवर सायोनी संतापली होती.
राजकारणात इमान आणि नीतिमत्ता
उरली नसल्याची खंत तिने व्यक्त केली होती. ‘‘तुम्हीसुद्धा भाजपमध्ये जाणार का?’’ असे त्यावेळी विचारले तेव्हा सायोनीला संताप अनावर झाला होता व म्हणाली होती की, ‘‘मैं चड्ढा नहीं, जो चड्डी हो जाऊंगी.’’ आता ती सायोनी चड्ढा झाली आहे व इमानदारीची झूल उतरवून नाचणाऱ्यांच्या घोळक्यात सामील झाली. म्हणूनच अनेकांना प्रश्न पडला असेल की, राजकारणातील अशा ‘सायोनी’ प्रवृत्तीचे करायचे काय? एखाद्याची बेइमानी व आसुरी महत्त्वाकांक्षा तिला थाळीतले वांगे बनवते. ‘थाळीतले वांगे’ हा फक्त एक वाप्रचार नाही, तर आजच्या भारतीय राजकारणातील एक कटुसत्य आहे. थाळीतले वांगे चुलीवरील कोणत्याही पदार्थात मिसळता येते. भरितापासून भज्यांपर्यंत सर्वत्र ते चालते. वांग्याला स्वतःची अशी चव नाही. त्याचप्रमाणे ‘सायोनी घोष’ छाप राजकारण्यांना कोणतीही भूमिका, विचारधारा, तत्त्व आणि निष्ठा नसते. सत्ता, पद व प्रसिद्धी, वैयक्तिक फायद्यासाठी या ताटातून त्या ताटात ते उड्या मारतात. वाटीत, ताटात, तव्यावर, चुलीत, चमच्यात, कढईत अशी सर्वत्र ही वांगी असतात. राजकारणात आज अशी अनेक वांगी फिरत आहेत. भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला ‘भाव’ नसला तरी मोदी-शहांनी अशा वांग्यांना एक निश्चित हमीभाव देऊन त्यांची भरभराट केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही मधल्या काळात अशा थाळीतल्या वांग्यांचे भरघोस पीक आले व या वांग्यांची मशागत चांगल्या प्रकारे सुरू आहे. सायोनी घोष यांचे प्रकरण एक अभ्यासाचा विषय आहे, केस स्टडी आहे. सायोनी यांनी थाळीतल्या वांग्याची भूमिका स्वीकारली आहे. थाळीतली वांगीदेखील
सरड्याप्रमाणे रंग
बदलतात. यावर ‘पीएच.डी.’ करून डॉक्टरेट वगैरे उपाध्या मिळवता येतील. साताऱ्यातील दरे गावात, बारामतीच्या काटेवाडी परिसरात अलीकडे वांग्यांची शेती बहरली व प्रत्येकाला वाटू लागले की, आपणही थाळीतले, ताटातले वांगे व्हावे. भारताला राष्ट्रीय प्राणी आहे, राष्ट्रीय पक्षी आहे, पण राष्ट्रीय भाजीचा दर्जा कोणालाच मिळाला नाही. हा मान वांग्यास मिळावा व वांग्याची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून सायोनी घोष, मिंधे वगैरे लोकांना बनवावे. देशातल्या राजकारणाची, विचारधारेची ही अधोगती आहे. देशात राजकारण म्हणजे स्वार्थाचा व्यापार झाला आहे. मतदारांनी एका चिन्हावर, पक्षाच्या भूमिकेवर मतदान करून निवडून द्यायचे व राजकारणातील स्वार्थी ‘वांग्यांनी’ लगेच स्वार्थापोटी त्या ताटातून दुसरीकडे उड्या मारायच्या. सध्या प. बंगालमधील ताटातल्या अशा वांग्यांचा भाव किती? महाराष्ट्रात हा भाव पंचवीस कोटींपासून पन्नास कोटींपर्यंत होता. विधान परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य मतदारसंघात हा भाव सर्व मिळून पाचशे कोटी झाला. कारण राज्यभरातील वांग्यांची सामुदायिक होलसेल खरेदी झाली. प. बंगालात वांग्याचा भाव महाराष्ट्रापेक्षा कमी असला तरी दिल्लीचे ‘वांगे’ पंधरा कोटींना व कोलकात्यातली वांगी दोन कोटींना विकत घेतल्याची माहिती आहे. वांगे हे सध्या स्वस्त व सगळीकडे उपलब्ध आहे. वांग्याला स्वतःची चव नाही. हवेत ठेवले की, लवकर मऊ पडते. वांगे आज भरवशाचे राहिले नाही. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ या गाण्याप्रमाणे वांगी व वांग्यांचे नेतेही टुणूक टुणूक चालत दिल्लीत जातात. तेथे त्यांची सालटी काढून त्यांना हवा तसा मीठ-मसाला, रंग फासून मोदी-शहांच्या किचनमध्ये लटकवून ठेवले जाते. द्राक्षाच्या अनेक जाती निर्माण झाल्या. आंब्याच्या जाती आहेत तशा वांग्याच्या जाती निर्माण झाल्या. त्यातली एक जात ‘सायोनी घोष’ वांगे! हे बियाणे ‘सायोनी सीडस्’ म्हणून प्रसिद्ध पावेल यात शंका नाही.































































