राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? शरद पवारांनीच प्रस्ताव दिल्याचा पटोले यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशपातळीवर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच याबाबतचा प्रस्ताव दिला असल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

केंद्रातील सध्याच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हाच सध्या देशासमोरील एकमेव अजेंडा आहे. यासाठी काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी काम सुरू केले आहे. आम्ही कोणालाही स्वतःहून विलीनीकरणाची ऑफर दिली नाही, मात्र सध्याची देशातील परिस्थिती पाहता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर प्रादेशिक नेत्यांनाही देशहितासाठी काँग्रेससोबत राहणे गरजेचे वाटत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही – शशिकांत शिंदे

काँग्रेसकडून कधीच विलीनीकरणाचा प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आला असता तर वरिष्ठांकडून माहिती देण्यात आली असती. ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीतही याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे काम करत असून पुढेही स्वतंत्र ओळख कायम ठेवेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केले.

प्रस्ताव आजचा नाही, तर खूप आधीच दिला – नाना पटोले

ममता बॅनर्जी असोत, शरद पवार असोत किंवा इतर धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष असोत, सर्वांमध्ये देश वाचवण्यासाठी काँग्रेससोबत एकत्र येण्याची भावना निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विलीनीकरणाचा प्रस्ताव आजचा नाही, तर खूप आधीच दिला गेला होता आणि आता त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, असा खुलासा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.