बजेट कोलमडले, सलग पाचव्या महिन्यात महागाईचा बॉम्ब फुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-अमेरिका युद्धाचा फटका बसल्याने गॅस सिलिंडरपासून अन्नधान्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आधीच महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून पडलेले असताना सलग पाचव्या महिन्यात किरकोळ महागाई वाढली आहे. देशातील किरकोळ महागाईचा दर (सीपीआय) मे महिन्यात 3.93 टक्क्यांवर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48 टक्के होता. तर जानेवारीमध्ये महागाईचा दर 2.74 टक्के होता.

केंद्र सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशा सलग पाच महिन्यात महागाईचा दर वाढलेला आहे. अन्नपदार्थ आणि इंधनामुळे निर्माण होणारे महागाई वाढीचे धोके आता ग्राहक किंमतींवर परिणाम करू लागले आहेत. धनाच्या किमतीतील वाढीचा परिणाम वाहतूक आणि उत्पादन खर्चावर होत असून त्याचे पडसाद ग्राहकांच्या खिशावर उमटू लागले आहेत. महागाईतील या वाढीमुळे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीसमोर (एमपीसी) नवे आव्हान उभे राहू शकते.

ग्रामीण भागात महागाई अधिक

एकूण महागाई दरातील वाढ ग्रामीण भारतात अधिक स्पष्टपणे दिसून आली. मे महिन्यात ग्रामीण भागातील किरकोळ महागाई दर 4.25 टक्के होता, तर शहरी भागात तो 3.53 टक्के होता. एप्रिलमध्ये ग्रामीण आणि शहरी महागाई दर अनुक्रमे 3.74 टक्के व 3.16 टक्के इतके होते. आगामी महिन्यांतील महागाईचे आकडे आणि रिझर्व्ह बँकेची भूमिकेकडे लक्ष लागले आहे.