
काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणात रिट याचिकेवर सुनावणी घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाचा निर्णय बरोबर होता की चुकीचा, यावर न्यायालयाने कोणतीही टिप्पणी केली नाही. मीनाक्षी नटराजन यांच्या याचिकेवर न्या. प्रशांत कुमार मिश्रा आणि न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी सीट चोरी झाली
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर मीनाक्षी नटराजन म्हणाल्या की, यापूर्वी मतांची चोरी व्हायची. आता सीट चोरी झालेली आहे. न्यायालयाने किमान आमचे म्हणणे ऐकले, मात्र आयोगाने 48 तासांपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही. आयोगाने तडजोड केल्याचे यावरून स्पष्ट होत असून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष नव्हती, असा आरोप नटराजन यांनी केला.


























































