
अभिषेक बॅनर्जी पक्षात राहिले तर मी राहणार नाही, असे म्हणत बंडाचे संकेत देणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचे आज अचानक सूर बदलले. ‘अभिषेक माझ्या मुलासारखा आहे. मुलाच्या चुका पोटात घालणे हे पित्याचे काम असते,’ असे कल्याण बॅनर्जी म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे ममतांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूलमध्ये उभी फूट पडली. आमदार आणि खासदारांनी वेगळे गट स्थापन केले. मोजकेच आमदार व खासदार ममता दीदींसोबत राहिले. त्यात कल्याण बॅनर्जी हे एक होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांनी ममतांचे भाचे अभिषेक यांच्यावर तोफ डागली. उद्धट आणि पक्ष उद्ध्वस्त करणाऱया अभिषेकसोबत काम करणार नाही, असे त्यांनी ठणकावले होते. त्यावर अभिषेक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कल्याणदा माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. मी काही बोलणार नाही, असे अभिषेक म्हणाले. त्यानंतर कल्याण बॅनर्जी यांची नाराजी दूर झाली आहे. अभिषेक यांच्या चुका माफ केल्याचे ते म्हणाले.
देशातील लोकशाही संकटात आहे. पश्चिम बंगालमध्ये अधिकच भयंकर परिस्थिती आहे. विरोधी पक्षच ठेवण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री सूडबुद्धीने वागतात. लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक आहे. अशा वेळी लढण्याची गरज आहे.’























































