Latur accident – चाकूरजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, धोंडे जेवून परतणाऱ्या पती-पत्नीसह एका मुलाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर-नांदेड महामार्गावरील चाकूर शहराजवळ असलेल्या अलगरवाडी फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण तिहेरी अपघात झाला. टेम्पो, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीसह कारमधील एका १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील तेलगाव येथील रहिवासी असलेले जनार्धन काळबा एलगे (वय ६०) आणि त्यांच्या पत्नी सविता जनार्धन एलगे हे दोघे पती-पत्नी नातेवाकांकडे धोंडे जेवणाचा कार्यक्रम आटोपून आपल्या दुचाकीवरून (MH 24 BL 2409) गावाकडे परतत होते. तर दुसरीकडे, शिरूर ताजबंद येथील तिघेजण कारने (MH 24 BR 7121) लातूरहून आपल्या गावाकडे जात होते.

दरम्यान, नांदेडहून लातूरच्या दिशेने वेगाने निघालेल्या एका टेम्पोने (MP 09 GH 1020) अलगरवाडी फाट्याजवळ या दोन्ही वाहनांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील जनार्धन एलगे व सविता एलगे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच कारमधील श्रेयस सचिन वाघमारे (वय १७, रा. शिरूर ताजबंद) या मुलाचाही जागीच प्राण गेला.

चालक फरार

अपघाताची भीषणता पाहून कारमधील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघात घडताच कंटेनर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

वाहतूक विस्कळीत

या भीषण अपघातामुळे लातूर-नांदेड महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारली आणि वाहतूक पूर्ववत सुरळीत केली. फरार कंटेनर चालकाचा शोध पोलीस घेत असून, एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने तेलगाव आणि शिरूर ताजबंद परिसरावर शोककळा पसरली आहे.