
देशात सध्या एका बाजूला चर्चा सुरू आहे ती ‘नीट’ सारख्या मोठ्या परीक्षांच्या पेपरफुटीची तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांतील खासदार आमदारांची फोडाफोडी करण्याची, त्यांना खरेदी करण्याची. पश्चिम बंगालच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात फूट पडली. तर महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पेपरफुटीतून मिळणार पैसा खासदार-आमदारांच्या खरेदीसाठी वापरला जात असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. तसेच जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत हे फोडाफोडीचे प्रकरण थांबणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
First, IAF planes, now telegram ban. This govt. is a total comedy circus.
Paper leaks will never stop. Because money from the business of paper leaks being used to buy MPs/MLAs? pic.twitter.com/KQLrCdPKeY
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 18, 2026
अरविंद केजरीवाल यांनी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटी रोखण्याचा उपाय म्हणून टेलीग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशी पावले उचलल्याने समस्या मूळापासून संपवता येणार नाही, असा आरोप केला आहे.
‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओ संदेशात केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले की, या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालणे हा समस्येवरील तोडगा नाही, आणि संबंधित अधिकारी या समस्येचे निवारण करण्याबाबत गंभीर नाहीत, असा दावा त्यांनी केला.
‘पेपरफुटीचा हा धंदा अब्जावधी रुपयांचा आहे’, असा आरोप त्यांनी केला, आणि अशा कृत्यांमधून गोळा होणारी मोठी रक्कम ‘टॉप’च्या लोकांपर्यंत पोहोचते, असा दावा त्यांनी केला.
केजरीवाल यांनी पुढे असाही आरोप केला की, पेपरफुटीच्या रॅकेटमधून मिळणारा पैसा खासदार, आमदारांची खरेदी करण्यासह राजकीय कारणांसाठी वापरला जात आहे. आता टीएमसीचे आमदार खासदार खरेदी केले, महाराष्ट्रातील खासदार, आमदार खरेदी करत आहेत. हे असेच थोडी खरेदी करू शकतात. पेपर फोडणे बंद केले तर खासदार, आमदार खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणणार. त्यामुळे पेपर असे थांबणार नाही, असा दावा त्यांनी केला.
‘जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत पेपरफुटी थांबणार नाही, ही संपूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल’, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.

























































