
यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये छोट्या संघांची दमदार कामगिरी कायम असून 43 व्या क्रमांकावरील डीआर कोंगोने बलाढ्य पोर्तुगालला 1-1 अशा बरोबरीत रोखण्याचा मोठा पराक्रम केला. तब्बल 52 वर्षांनंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या कोंगोने स्पर्धेतील आपला पहिलाच गोल नोंदवला. दुसरीकडे, सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला मात्र गोल करता आला नाही आणि पोर्तुगालला सामान बरोबरीत सोडवावा लागला. त्यामुळे पोर्तुगालसह रोनाल्डोवर ही सर्वात मोठी नामुष्कीची वेळ आहे.
ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियमवर झालेल्या ‘क’ गटातील या सामन्यात पोर्तुगालने सहाव्याच मिनिटाला आघाडी घेतली. पेड्रो नेटोच्या अचूक क्रॉसवर जोआओ नेव्हेसने शानदार हेडर मारत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर पोर्तुगालला आणखी गोल करता आला नाही.
पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत कोंगोने जोरदार प्रत्युत्तर दिले. आर्थर मासुआकूच्या क्रॉसवर योआने विस्साने अचूक हेडर मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला. हा गोल कोंगोच्या विश्वचषक इतिहासातील पहिलाच गोल ठरला.


























































