नांदेड पुन्हा हादरले! आधी गोळ्या झाडल्या, नंतर शस्त्राचे वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड शहरात हत्येचे सत्र सुरूच आहे. अज्ञात कारणातून मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमरास ही घटना घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शेख शमीम शेख इसाक (42) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी इसाक यांना गोळ्या घालून ठार केले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून नांदेड शहरात गँगवार, हत्येच्या घटना सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान शेख शमीम शेख इसाक हे आपल्या एका मित्रासोबत वाघी रस्त्यावरील एका पान टपरीजवळ ओट्यावर बसले होते. त्याचवेळी दुचाकींवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ येऊन परिसरातील दर्गाहचा पत्ता विचारला. शेख शमीम हे पत्ता सांगत असतानाच शमीम यांच्यासोबत असलेल्या मित्राच्या नजरेस हल्लेखोरांकडे पिस्तूल असल्याचे दिसले. परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी शमीम यांना सावधगिरीचा इशारा देण्याचा प्रयत्न केला, मात्र तेवढ्यात हल्लेखोरांनी शेख शमीम यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. शमीम यांच्यावर आधी गोळीबार करण्यात आला व नंतर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या.

तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना सकाळी सुमारे 5 वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी गोळीबार झाल्याचे संकेत देणारे पुरावे आढळल्याची चर्चा असून तेथे रिकामी काडतुसे सापडल्याचेही सांगितले जात आहे. तथापि, यास पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक अजित कुंभार, अतुल भोसले तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराचा पंचनामा करून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही हत्या कोणत्या कारणातून झाली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.