
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर अद्यापही निकाल लागलेला नाही. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजप आणि मिंधे गटाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मिंधेचा खरपूस समाचार घेतला. शहा यांच्या दबावामुळेच देशातील सर्वोच्च संस्था आणि न्यायालय स्वतंत्रपणे काम करू शकत नसल्याचा आरोप करत, भविष्यात भाजपमध्येच मोठे बंड होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगावर अमित शहांचा दबाव असल्याचे म्हटले. शिवसेना कोणाची हा निर्णय चार वर्षात अमित शहांच्या दबावामुळे सुप्रीम कोर्ट देऊ शकला नाही. आणि त्यांच्याच दबावामुळे निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष मिंधे गटाला दिला. अमित शहांचा दबाव आणि दहशतीमुळे सातत्याने शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमित शहांच्या पोटातलं विष अमित शहांच्या ओठावर आलंय. मिंधे हे शिवसेनाप्रमुख आहेत, असं ते कालच्या भाषणात म्हणाले. शिवसेनाप्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा ही शहांनी एकनाथ शिंदेंना दिली. त्यामुळे या महाराष्ट्राच प्रचंड नुकसान झालेलं आहे. तरीही जर मिंधे गट अमित शहांच्या नावाने टाळपिटाळे करत असतील तर ते महाराष्ट्राच्या मातीशी आणि आईशी गद्दारी करत असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली.
अमित शहा यांच्या राजकीय खेळींमागे एक मोठे अंतर्गत षडयंत्र असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला. अमित शहा एक व्यापारी आहेत. त्यांच्या मुळचा उद्योग शेअर बाजारात पैसे गुंतवणे, फायदा करून घेणं आणि मग शेअर्सचे कृत्रिम भाव वाढवणं, पैसे वर खाली करणं हाच त्यांचा व्यवसाय आहे. बाकी सगळं ढोंग आहे. त्यांनी या देशात अराजकता निर्माण करण्याची सुपारी घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला. ही सुपारी कोणाकडून घेतली आहे हे भविष्यातला काळच ठरवेल. ज्या पद्धतीने या देशातील, राज्यातील सर्व प्रादेशिक पक्ष फोडून आपल्या पाठीशी उभे करून भविष्यात नरेंद्र मोदींना आव्हान देण्याचे त्यांचे षडयंत्र आहे. या षडयंत्रात त्यांनी एकनाथ शिंदेंसारख्या लोकांना सामील करून घेतल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला.
उद्या याच खासदारांच्या बळावर अमित शहा स्वतः पंतप्रधान मोदींविरोधात बंड करू शकतात, त्याचीच ही पूर्वतयारी सुरू आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. मात्र मोदींनंतर भाजपचा पंतप्रधान होणार नाही, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.























































