
फिफा वर्ल्ड कपमध्ये गोलांचा असा पाऊस पडतोय की, इतिहासालाही छत्री उघडावी लागली आहे. या स्पर्धेने तब्बल 68 वर्षांतील एक मोठा विक्रम मोडला आहे. 1958 नंतर सर्वात वेगाने 100 गोलांचा टप्पा गाठणारा हा वर्ल्ड कप ठरला असून अवघ्या 33 सामन्यांतच गोलांचे शतक पूर्ण झाले.
हा ऐतिहासिक क्षण नेदरलँड्स-स्वीडन सामन्यात आला. स्वीडनचा 5-1 असा धुव्वा उडवताना नेदरलँड्सचा स्टार खेळाडू कॉडी गाकपोने केलेला तिसरा गोल हा स्पर्धेतील शंभरावा गोल ठरला आणि इतिहासात नोंदला गेला.
सध्या वर्ल्ड कपमध्ये दर सामन्याला सरासरी 3.09 गोल होत आहेत. या वेगाने स्पर्धा सुरू राहिली तर 300 गोलांचा टप्पा सहज पार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत 36 सामने पूर्ण झाले असून गोलांची संख्या 110 वर पोहोचली आहे.
वर्ल्ड कपच्या इतिहासात यापेक्षा वेगाने 100 गोलांचा टप्पा फक्त 1954 च्या स्वित्झर्लंड वर्ल्ड कपमध्ये गाठला गेला होता. तेव्हा अवघ्या 20 सामन्यांत 100 गोल झाले होते आणि पश्चिम जर्मनी विजेता ठरला होता. 2014 आणि 1982 मध्ये 100 गोलांसाठी 36 सामने लागले होते, तर 1978 आणि 1994 मध्ये हा टप्पा गाठण्यासाठी 38 सामने खेळावे लागले होते.
विशेष म्हणजे या स्पर्धेतील पहिल्या 100 गोलांपैकी 46 गोल पहिल्या सत्रात, तर 54 गोल दुसऱ्या सत्रात झाले आहेत. म्हणजे अखेरच्या शिट्टीपर्यंत आक्रमणाचा जोर कायम आहे. एकूणच, वर्ल्ड कप हा बचावपटूंचा नव्हे, तर स्ट्रायकरांचा उत्सव ठरत असून सध्या चेंडूपेक्षा गोलच अधिक वेगाने धावताना दिसत आहेत.



























































