
मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांची कन्या नगरसेविका राजुल पाटील यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘मी शिवसेनेसोबतच आहे आणि माझे काम निष्ठेने करेन,’ अशी ग्वाही त्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिली.
शिवसेनेने दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला खासदार संजय दिना पाटील हे उपस्थित नव्हते. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनालाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राजुल पाटील आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचल्या. उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांनी आपली भूमिका मांडली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.
‘मातोश्री’वरून बाहेर पडल्यानंतर राजुल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मी माझे म्हणणे मांडले. त्यांनी माझे ऐकून घेतले. त्यावर ते समाधानी आहेत. मी शिवसेनेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. माझ्यावर जी जबाबदारी आहे ती पार पाडत आहे,’ असे त्यांनी सांगितले.
वडिलांचा निर्णय ते स्वतः घेतील !
वडील संजय दिना पाटील यांच्या निर्णयाबद्दल पत्रकारांनी विचारले असता राजुल पाटील म्हणाल्या, ‘आमच्या घरात प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घेण्याची मुभा आहे. मी माझा निर्णय पक्षप्रमुखांना कळवला आहे. वडिलांच्या निर्णयाबद्दल मी बोलू शकत नाही. ते त्यांचा निर्णय घेतील आणि आपल्याला कळवतील.’



























































