आला पाऊस, गेला पाऊस…! मुंबईत सकाळच्या गारव्यानंतर दिवसभर कडक ऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईसह उपनगरांत रविवारी सकाळी पावसाची हजेरी लागली. जवळपास १५ ते २० मिनिटांच्या दमदार हजेरीने हवेत काही काळ गारवा निर्माण झाला. मात्र पुढच्या काही वेळेतच कडक ऊन पडले आणि पुन्हा उष्ण वातावरण तयार झाले. त्यामुळे ‘आला पाऊस, गेला पाऊस’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुंबईकरांच्या तोंडून बाहेर पडली. दरम्यान हवामान खात्याने मान्सून सक्रिय झाल्याची खूशखबर देत ‘यलो अलर्ट जारी केला. जून महिना संपत आला तरी मुंबईत पावसाची जोरदार हजेरी लागलेली नाही. तळकोकणात वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनचा वेग मंदावल्याने मुंबईकर अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत होते. मे महिन्यासारखेच तीव्र ऊन पडत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण आहेत. अशातच रविवारी सकाळी सवाआठच्या सुमारास मुंबईसह उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. गिरगाव, भायखळा, दादर, कुलाबा, अंधेरी, वांद्रे, माहीम, परळ, मुंबई सेंट्रल परिसरात १५ ते २० मिनिटे पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिक सुखावले होते. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पडलेला पाऊस लहानग्यांनी ‘एन्जॉय’ केला. नागरिकांनाही सुट्टीमुळे घरी पावसाचा आनंद घेता आला. मात्र पुढच्या काही वेळातच पुन्हा कडक ऊन पडले आणि नागरिकांचा हिरमोड झाला. संपूर्ण दिवसभर ऊन राहिल्याने कमाल तापमानाची पातळी ३५ अंशांच्या घरात राहिली. यापूर्वीही पावसाने दोन ते तीनवेळा हुलकावणी दिली होती.

रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला
सकाळी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे काही भागांत पाणी साचले होते. तसेच रस्ते निसरडे बनल्याने गाड्यांचे किरकोळ अपघातही घडले. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्गासह रेल्वे स्थानकांच्या दिशेने जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.
पुढील दोन दिवस मान्सूनसाठी अनुकूल जूनच्या सुरुवातीला मान्सून दक्षिण कोकणात पोहोचला होता. मात्र ८ जूनपासून मान्सूनचा प्रवास सोलापूरजवळ रेंगाळला होता. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नवीन अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांत म्हणजेच २३ जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या दिशने पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. देशाच्या बहुतांश भागांत अजूनही मान्सूनपूर्व स्थिती आहे. आठ राज्यांत तापमान ४० अंशांच्या पुढे आहे. दोन दिवसांत स्थिती बदलण्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.