
कन्नड सक्तीसह सीमाप्रश्नासंदर्भात कितीही दडपशाही केली तरी लोकशाही मार्गाने २९ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाने धडक देण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर येथील सभेत पोलीस प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करत त्यांना सभेतून ओढून बाहेर काढण्यात आले. सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मराठी भाषिकांना पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या एकाही लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप केला नाही, याबद्दल सीमाभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही आता मागे हटणार नसून, तीव्र आंदोलन करण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे, असे मरगाळे यांनी सांगितले. कन्नड सक्तीला विरोध करणाऱ्या समिती कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींकडून सहकार्य मिळत नसल्याने नाराजी उमटली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात कर्नाटक सरकारकडून सीमाभागात होत असलेल्या कन्नड सक्तीविरोधात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना निवेदन देण्याची परवानगी मागितलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना बेळगावतच स्थानबद्ध करण्यात आले. कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या पत्रामुळे कार्यकर्त्यांना रोखण्यात आले.


























































