औषधाचे नाव चोरले, पॅकेजिंगही हुबेहूब केले; हायकोर्टाचा ऑल्टो हेल्थकेअरसह अन्य एकाला दणका, ट्रेडमार्क उल्लंघनप्रकरणी ठोठावला दहा लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai High court

ट्रेडमार्कच्या उल्लंघनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ऑल्टो हेल्थकेअरसह अन्य एका प्रतिवादीला दणका दिला आहे. औषधांच्या बॅण्डच्या नावाचा आणि पॅकेजिंगचा गैरवापर केल्याप्रकरणी हायकोर्टाने दोघा प्रतिवाद्यांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावत दंडाची दहा लाख रुपये रक्कम याचिकाकर्त्या कंपनीला दोन महिन्यात देण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर ट्रेडमार्कचा वापर प्रतिवाद्यांनी यापुढे पुन्हा करू नये, असे न्यायालयाने प्रतिवाद्यांना बजावले आहे.

ब्लू क्रॉस लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड ही औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी असून या कंपनीकडून मेफ्टल आणि मेफ्टल स्पास या नावाने बाजारात औषध विक्री केली जाते. ऑल्टो हेल्थकेअर व अन्य एकाने मेफ्टल स्पास या उत्पादनाचे ट्रेडमार्क आणि आर्टवर्क वापरल्याने ब्लू क्रॉस लेबोरेटरीजने हायकोर्टात याप्रकरणी दावा दाखल केला होता. या दाव्यावर न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने सुनावणीवेळी दावा दाखल करणाऱ्या ब्लू क्रॉस लेबोरेटरीजच्या बाजूने निकाल दिला. प्रतिवाद्यांनी केवळ एक अक्षर बदलून मेफियल स्पास या नावाने उत्पादन घेतले होते. जे याचिकाकर्त्यांच्या मूळ बॅण्ड नावाशी मिळतेजुळते होते. तसेच ते ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचे न्यायालयाने नमूद केले. इतकेच नव्हे तर प्रतिवादींनी केवळ नावच नव्हे तर पॅकेजिंग रंगसंगती आणि डिझाइनची हुबेहूब नक्कल केली होती, असे स्पष्ट करत न्यायालयाने प्रतिवाद्यांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला व मुदतीत दंड भरला नाही तर त्यावर वार्षिक आठ टक्के व्याज आकारले जाणार असल्याचे आदेशात नमूद केले.