
अयोध्येतील राम मंदिरात दानाच्या रकमेत झालेल्या चोरीच्या प्रकरणावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “अयोध्येत जे घडले ते महापाप असून, भाविकांच्या विश्वासाला दिलेला तडा आहे. श्रद्धेशी झालेला हा खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असा संताप अखिलेश यादव यांनी व्यक्त केला आहे. तसेच लखनऊमध्ये झालेल्या भीषण अग्नितांडवावरूनही त्यांनी योगी सरकारला धारेवर धरले. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी प्रशासनाच्या अपयशावर बोलताना अखिलेश यादव यांनी तपासासाठी नेमलेल्या एसआयटीवर (SIT) खोचक टीका केली. ते म्हणाले, “एसआयटीचा अर्थ नेमका काय होतो? ‘Share in theft’ (चोरीतील वाटा)? हा तर लोकांच्या विश्वासाला दिलेला तडा आणि महापाप आहे. संपूर्ण देश आणि जगभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने अयोध्येत देणगी देतात. ही आपली सनातनी परंपरा आहे. जर या परंपरेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर हे अत्यंत चुकीचे आहे.”
लखनऊच्या अलीगंज भागात नुकत्याच घडलेल्या अग्नितांडवावरून अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य केले. “जर वेळीच सर्व सुविधा उपलब्ध असत्या आणि प्रशासनाने आधीच लक्ष दिले असते, तर निष्पाप मुलांचे प्राण वाचवता आले असते. सरकार जर वेळेवर जागे झाले असते, तर ही दुर्घटना घडलीच नसती,” अशी टीका त्यांनी केली.


























































