
मंत्रालयात उपायुक्त म्हणून काम करत असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केले. अल्ताफ हुसेन शैख (४५) असे त्या भामट्याचे नाव आहे. गोरेगाव येथील स्वामी समर्थ सोसायटीत राहणारा अल्ताफ केवळ दहावीपर्यंत शिकलेला आहे. पण तो महाराष्ट्र शासनात उपायुक्त दर्जाचा अधिकारी असल्याचे खोटे सांगून नागरिकांची दिशाभूल व फसवणूक करत होता. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने मालाड पूर्वेकडील पृथक हॉटेलजवळ सापळा रचून पकडले. त्याच्याकडून ओळखपत्रे, विविध शासकीय संस्थांची डिजिटल आयडी कार्ड, नियुक्तीपत्रे, अधिकृतता पत्रे, शासकीय विभागांचे लेटरहेड जप्त करण्यात आली.
जन्माला येणाऱ्या आजारी बाळाचा खर्च न परवडणारा
जन्माला येणारे बाळ आजारी असणार आहे. त्याच्या उपचाराचा खर्च विवाहितेला परवडणारा नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने एका महिलेला गर्भपातास परवानगी दिली. ही महिला २६ आठवड्यांची गरोदर आहे. ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. विविध आजार घेऊन जन्माला येणाऱ्या बाळाचा खर्च तिला परवडणारा नाही. परिणामी या महिलेला आम्ही गर्भपातास मंजुरी देत आहोत, असे न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले. सध्या महिला रायगड येथील सरकारी रुग्णालयात दाखल आहे. तेथील डॉक्टरांनी गर्भपाताची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रक्रियेनंतर महिलेची वैद्यकीय काळजी घ्यावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. बाळाला हृदयरोग असल्याने या महिलेने गर्भपातासाठी याचिका केली होती.




























































