व्हेनेझुएलात 125 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप; 14 हजार किमी दूर महाप्रलय, पण ‘धक्के’ हिंदुस्थानला, कसं ते जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हेनेझुएलामध्ये 24 जून रोजी अवघ्या काही सेकंदांच्या अंतराने 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंप झाले. गेल्या 125 वर्षांतील हे सर्वात शक्तिशाली भूकंप मानले जात आहेत. या नैसर्गिक आपत्तीत 589 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. तसेच हजारो लोक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हिंदुस्थानपासून 14 हजार किलोमीटर अंतरावर ही नैसर्गिक आपत्ती आली असली तरी याचे दूरगामी परिणाम हिंदुस्थानच्या तेल व्यापारावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इराण आणि अमेरिकेमध्ये नुकताच शांतता करार झाला. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा हिंदुस्थानचा तेल पुरवठा पूर्ववत होण्याची आशा पल्लवीत झाली होती. पण हा मार्ग पुन्हा एकदा बंद झाल्याने हिंदुस्थानपुढील आव्हाने वाढली. त्यात व्हेनेझुएलातील भूकंपामुळे हिंदुस्थानच्या तेल धोरणासमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे.

आखातातील तणावामुळे हिंदुस्थानने गेल्या काही महिन्यांत व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढवली होती. एप्रिल आणि मे महिन्यांत तर व्हेनेझुएला हिंदुस्थानचा एक मुख्य तेल पुरवठादार देश बनला होता. हिंदुस्थानने अगदी कमी कालावधीत व्हेनेझुएलाला एक महत्त्वाचा तेल पुरवठादार देश बनवले आहे. त्यामुळे तिथल्या तेल पायाभूत सुविधांना धक्का बसल्यास त्याचा थेट परिणाम हिंदुस्थानवर होणार आहे, असे मत ‘EDME इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि जागतिक नैसर्गिक संसाधन प्रमुख कुणाल खन्ना यांनी व्यक्त केले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

तेल कंपन्यांपुढे मोठे आव्हान

शक्तिशाली भूकंपानंतर व्हेनेझुएलाचे प्रमुख मालवाहू बंदर ला गुआयरा येथे सध्या आपत्ती घोषित करण्यात आली आहे. तेल शुद्धीकरण कारखाने आणि बंदरांना वीज पुरवठा करणारे ग्रीड्स तसेच रस्ते खचल्यामुळे तेल वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. बंदरांवर जहाजांना खोळंबून राहावे लागल्यास विलंब शुल्क आणि वाहतूक खर्च वाढेल. याचा थेट फटका हिंदुस्थानी तेल कंपन्यांना बसेल. आतापर्यंत या सागरी मार्गावरील विम्याचे दर हे केवळ राजकीय तणाव आणि जागतिक निर्बंधांचा विचार करून ठरवले जात होते. मात्र, आता त्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका जोडला गेल्याने सागरी विम्याचे हप्ते महागण्याची शक्यता आहे.

व्हेनेझुएलात भूकंपबळींची संख्या 589 वर, 39 हजार बेपत्ता; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू, मलब्याखाली हजारो जीव अडकलेलेच

भावी करारांना आणि गुंतवणुकीला विलंब होण्याची शक्यता

हिंदुस्थानची सरकारी कंपनी ओएनजीसी विदेश हिने व्हेनेझुएलातील अनेक तेल प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या भूकंपामुळे या प्रकल्पांच्या आर्थिक आणि ऑपरेशनल कामकाजाला मोठा फटका बसू शकतो. विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहू राष्ट्रपती डेलसी रॉड्रिग्ज यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. यामध्ये खाणकाम, औषधनिर्माण, ऑटोमोबाईल आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांत हिंदुस्थानी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर चर्चा झाली होती. मात्र, या भूकंपामुळे या भावी करारांना आणि गुंतवणुकीला आता विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.