नागपुरात गरजूंसाठी अनोखा बाजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात वापरात नसलेल्या पण चांगल्या स्थितीत असलेल्या अनेक वस्तू वर्षानुवर्षे अडगळीत पडून राहतात. एखाद्यासाठी अनावश्यक ठरलेल्या या वस्तू दुसऱया एखाद्या गरजू व्यक्तीच्या आयुष्यात मोठा आधार ठरू शकतात. याच सामाजिक जाणिवेतून ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पांतर्गत ‘अनोखा बाजार’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री होणार नाही. ज्यांच्याकडे अतिरिक्त वस्तू आहेत त्यांनी त्या द्यायच्या आणि ज्यांना गरज आहे त्यांनी त्या सन्मानाने घ्यायच्या, अशी संकल्पना या उपक्रमामागे आहे. वस्तूंची नव्हे तर आनंद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीची देवाणघेवाण घडवून आणणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे या उपक्रमातून ज्यांना वस्तूंची गरज नाही आणि त्यांच्याकडे वस्तू पडलेल्या आहेत, त्यांच्याकडील वस्तू गरजूंच्या कामी येणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत ‘अनोखा बाजार’ भरविण्यात येणार आहे. बाजारात उपलब्ध सर्व वस्तू गरजूंसाठी पूर्णपणे मोफत असतील.