अवकाळीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांसाठी 717 कोटी रुपये मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात फेब्रुवारी ते जूनपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या 7 लाख 9 हजार शेतकऱ्यांसाठी 717 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती आज मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात झालेल्या सुमारे 1 लाख 22 हजार 993 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा या पिकांसह केळी, द्राक्षे, आंबा, काजू आणि संत्रा या फळबागा भुईसपाट झाल्या. जळगाव आणि अकोल्यासह अनेक ठिकाणी वीज पडून पशुधनाचीही मोठी जीवितहानी झाली होती. यासंदर्भात आमदार विक्रम काळे, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, एकनाथ खडसे व आदी आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मकरंद पाटील यांनी ही माहिती दिली.