
परळमधील एफ-दक्षिण वॉर्डात शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम करताना कंत्राटदाराने पर्जन्यवाहिनी पह्डल्याने जगन्नाथ भातणकर मार्गावर पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास भोगावा लागत असल्याकडे शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे सरकारचे लक्ष वेधले.
पर्जन्यवाहिनी पंत्राटदाराने तोडली. त्याच्या दुरुस्तीसाठी आपण महापालिका अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. सहाय्यक आयुक्तांनी तातडीने काम करण्याची सूचना केली. एमएमआरडीएने बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही काम न झाल्याने पंत्राटदाराला दीड कोटींचा दंड ठोठावला गेला. परिणामी 26 जून रोजी पाणी तुंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. जगन्नाथ भातणकर मार्गावरील आवश्यक कामे पूर्ण करणे गरजेचे असताना एमएमआरडीएकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शासनाने एमएमआरडीएला निर्देश द्यावेत तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली.


























































