जोगश्वरीतील झोपडीधारकांना शिवसेनेमुळे दिलासा, तक्षशिला सोसायटी येथील झोपडय़ांच्या पुनर्वसनासाठी लवकरच भूसंपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी (पूर्व) येथील तक्षशिला सोसायटीलगत धोकादायक संरक्षण भिंतीजवळ जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या 60 झोपडीधारकांना शिवसेनेमुळे दिलासा मिळाला आहे. या झोपडय़ा ज्या खासगी भूखंडावर आहेत त्याचे भूसंपादन करून या झोपडीवासीयांचे पुनर्वसन जवळच्या तक्षशिला संगम सोसायटीच्या प्रकल्पामध्ये केले जाईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिले.

शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. तक्षशिला सोसायटीच्या पश्चिमेकडे सध्या धोकादायक झालेल्या संरक्षण भिंतीजवळ या 60 झोपडय़ा आहेत. त्यांना संरक्षण दिले जावे अशी मागणी आमदार नर यांनी केली.

गेल्या 18 वर्षांपासून तक्षशिला सोसायटीचा प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे या झोपडय़ांचा रस्ताच बंद झाला आहे. झोपडपट्टी पुनर्विकास विभागाने (एसआरए) या प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वीच लगतच्या या झोपडय़ांचाही विचार करून त्यांना पुनर्विकास प्रकल्पात समाविष्ट करायला हवे होते याकडे आमदार नर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शासनाने क्लस्टरसाठी सर्वेक्षण केले. त्यात या झोपडय़ांचा समावेश होता, परंतु आता त्या हटवण्यात येतील असे सांगण्यात आल्याने झोपडीवासीय चिंतेत पडले आहेत, त्यातच तक्षशिला संगम सोसायटी प्रकल्पामुळे या झोपडय़ांचा मार्गही बंद केला जात असल्याचे ते म्हणाले.

मंत्री शंभूराज देसाई यांनी या लक्षवेधीला उतर दिले. संबंधित परिसरात संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी 27 मे 2016 रोजी संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या, मात्र संबंधित झोपडय़ांचा पुनर्वसन योजनेत समावेश करण्यासाठी जमीन मालकाची संमती आवश्यक आहे. वारंवार पाठपुरावा करूनही ती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे क्लस्टर पुनर्विकास धोरणाच्या कलम 14 (1) अंतर्गत भूसंपादनाची कारवाई करून या झोपडीवासीयांचे जवळच्या प्रकल्पामध्ये पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली.