
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा अटक ते कटक असा विस्तार केला. तो नकाशा म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नाही तर आपल्या पराक्रमाचा आणि शौर्याचा जिवंत पुरावा आहे, असा संताप व्यक्त करत काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी एनसीईआरटीच्या पाठय़पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याबद्दल व्यक्त केला.
शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची मोडतोड महाराष्ट्राला कदापि मान्य नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
नितीन राऊत यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडताना ही बाब अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले. जेव्हा विद्यार्थी तो नकाशा पाहतात, तेव्हाच त्यांना उमजते की मराठय़ांच्या घोडय़ांनी अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत मजल मारून सिंधू नदीचे पाणी प्यायले होते. तो नकाशा हटवून मराठा साम्राज्याचा पराक्रम पुसण्याचा हा प्रयत्न आहे, असा थेट आरोप नितीन राऊत यांनी केला.
मराठीच्या पुस्तकात परप्रांतीयांची नृत्ये
बालभारतीच्या पाठय़पुस्तकांमधील त्रुटींवरही आमदार राऊत यांनी बोट ठेवले. इयत्ता 6वीच्या मराठीच्या पाठय़पुस्तकात महाराष्ट्राचे केवळ एक नृत्य दाखवून इतर चार नृत्ये राज्याबाहेरील दाखवली जातात. तसेच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी देशातील पहिली शाळा काढली असताना, पुस्तकात केवळ ‘महाराष्ट्रातील’ असा संकुचित उल्लेख करून इतिहासाची मोडतोड केली जात आहे, असे नितीन राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. ही अक्षम्य चूक करणाऱ्या तज्ञ समितीवर शासन कोणती फौजदारी किंवा दंडात्मक कारवाई करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


























































