
आदिवासी विकास महामंडळाच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ५४ शेतकऱ्यांना बसला आहे. या शेतकऱ्यांचे लाखो रुपये पोर्टलमध्ये अडकल्याने ऐन खरीप हंगामात त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे ५४ शेतकऱ्यांचे ‘पोर्टल’मध्ये अडकलेले पैसे मिळणार तरी केव्हा, असा सवाल विचारण्यात येत आहे.
भात विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याची नोंद महामंडळाच्या प्रणालीमध्ये दिसत असली तरी प्रत्यक्षात अनेकांच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. बँक खात्यांचे तपशील भरताना झालेल्या गंभीर चुका आणि योग्य पडताळणी न झाल्यामुळे हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारने या गंभीर हलगर्जीपणाची तातडीने दखल घेऊन जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शहापूर व मुरबाड तालुक्यातील सुमारे अनेक शेतकरी या त्रुटीचे बळी ठरले आहेत. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे, खत आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची नितांत गरज असताना हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या निष्काळजीपणाचा फटका सावरपाडा येथील महिला शेतकरी हर्षला शिंदे यांनाही बसला आहे. त्यांनी चोंढे (डोळखांब) भात खरेदी केंद्रावर धान्य विकले. महामंडळाने पैसे पाठवल्याचा दावा केला असला तरी त्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही.
तीन दिवसांत मोबदला देण्याचे आश्वासन
केवळ तांत्रिक कारणांची ढाल बनवून जबाबदारी टाळू नये. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि सर्व शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान ‘शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निदर्शनास आल्याने त्या अडचणी सोडवण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व शेतकऱ्यांना दोन तीन दिवसांत त्यांचा मोबदला खात्यात जमा करण्यात येईल, असे आदिवासी विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक तुषार वाघ यांनी सांगितले.


























































