बळीराजाची चार तास उपाशीपोटी रखडपट्टी, रायगड जिल्हा परिषदेचा असाही कृषी मेळावा, प्रमुख पाहुण्यांना उशीर ; ना पाणी ना दिलगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खालापूरच्या बळीराजाची तब्बल चार तास उपाशीपोटी रखडपट्टी झाली असल्याचा संतापजनक प्रकार रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी मेळाव्यात समोर आला आहे. कृषी मेळाव्याला प्रमुख पाहुणे उशिरा आल्यामुळे कार्यक्रम तब्बल चार तास रखडला. शेतकऱ्यांना दुपारपर्यंत सभागृहात बसवून ठेवण्यात आले होते. पाण्याने आणि भुकेने व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने ना पाणी विचारले ना त्यांची दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सर्वसामान्यांचे व बळीराजाचे सरकार असल्याचे सत्ताधारी केवळ भाषणांमध्ये सांगतात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कशी वागणूक दिली जाते याचे संतापजनक उदाहरण तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात पाहायला मिळाले. रायगड जिल्हा परिषदेतर्फे खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी अनेक शेतकरी सकाळी १० वाजल्यापासून आपल्या कुटुंबासह उपस्थित होते.

रोष दिसताच काढता पाय
कार्यक्रम सुरू होताच एका संतप्त शेतकऱ्याने आपल्या भाषणातून उशिरा आलेल्या पाहुण्यांना थेट जाब विचारत खरमरीत शब्दांत संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा रोष दिसताच अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.
मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि कृषी पशुसंवर्धन समिती सभापती वैकुंठ पाटील हे चार तास उशिरा आल्याने कार्यक्रम वेळेत सुरू झाला नाही. नुकतीच पावसाला सुरुवात झाल्याने शेतातील महत्त्वाची कामे बाजूला ठेवून शेतकरी या कार्यक्रमासाठी आले होते. परंतु त्यांच्या वेळेची किंमत प्रशासनाला नसल्याने शेतकऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली.