
एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी माजी निवडणूक आयुक्त आणि माजी अर्थ सचिव राजीव कुमार यांची बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यात राजीव कुमार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. नैतिकतेच्या मुद्द्यांचे कारण देत अतनू चक्रवर्ती यांनी मार्चमध्ये अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बँकेने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये जाहीर केले की, संचालक मंडळाने ३० जून २०२६ पासून पुढील ४ वर्षांच्या कालावधीसाठी राजीव कुमार यांची बँकेचे स्वतंत्र संचालक (इंडिपेंडेंट डायरेक्टर) म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे.
यासोबतच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मंजुरीच्या अधीन राहून, बँकेने मंजूर केलेल्या तारखेपासून पुढील ३ वर्षांच्या कालावधीसाठी कुमार यांची बँकेचे पार्ट-टाईम चेअरमन म्हणून नियुक्ती आणि त्यांच्या मानधनालाही मंडळाने मंजुरी दिली आहे, असे त्यात म्हटले आहे.
राजीव कुमार ट्रोल
सवा साल पहले मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार ने अपनी सेवानिवृत्ति के बाद हिमालय की वादियों में समय बिताने की घोषणा की थी। वे शहर की भागदौड़ से दूर जाकर खुद को ‘डिटॉक्स’ करना और एकांत में आत्म-अध्ययन करना चाहते थे। अब वे 3 साल के लिए @HDFC_Bank के अंशकालिक अध्यक्ष बन गए हैं.
इस…
— Pankaj Sharma पंकज शर्मा (@Pankaj___Sharma) June 29, 2026
दरम्यान, राजीव कुमार यांच्या नियुक्तीनंतर सोशल मीडियावर ते ट्रोल होताना दिसत आहे. सव्वा वर्षापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हिमालयात आपले उर्वरित जीवन व्यतीत करणार असल्याचे जाहीर केले होते. शहरी धावपळीच्या जीवनापासून दूर जात ते स्व-अध्ययनाकडे वळणार असे त्यांनी सांगितले होते. मात्र आता त्यांना तीन वर्षांसाठी पार्ट-टाईम चेअरमन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या या नव्या नियुक्तीवरून त्यांच्यावर टीका होत आहे.


























































