सिया गोयलच्या भावावर वकीलाचा 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, बजावली नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वकील असल्याचा दावा करणारे अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याला १० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. साहिलने केलेल्या खोट्या आणि बदनामीकारक आरोपांमुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी साहिल गोयल याने ‘इंडिया टुडे टीव्ही’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने दावा केला होता की, गोयल कुटुंबाने अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांची वकील म्हणून नियुक्ती केलेली नाही. इतकेच नव्हे तर, श्रीवास्तव यांनी फसवणूक करून सिया गोयल हिची काही कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्याचा संशयही साहिलने व्यक्त केला होता.

या विधानांवर तीव्र आक्षेप घेत अ‍ॅड. श्रीवास्तव यांनी साहिलला कायदेशीर नोटीस बजावली असून १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आपल्या टीमने सिया गोयल हिची तिच्या संमतीने भेट घेतली होती आणि तिनेच आपल्याला खटला लढवण्याची परवानगी दिली होती, असा दावा श्रीवास्तव यांनी केला आहे.

न्यायालयात काय घडले?

हा वाद सोमवारी वडगाव मावळ न्यायालयातही पाहायला मिळाला. अ‍ॅड. श्रीवास्तव यांनी न्यायालयात हजर राहून सिया गोयलचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा केला आणि तिच्या स्वाक्षरीचा ‘वकालतनामा’ सादर केला. मात्र, सिया गोयल हिने न्यायाधीशांसमोर अ‍ॅड. विपुल दुशिंग हेच तिचे खरे वकील आहेत, श्रीवास्तव नाहीत असे सांगितल्याचे समजते. सियाच्या कुटुंबीयांनीही याच भूमिकेचा पुनरुच्चार केला असून, त्यांनी अधिकृतपणे केवळ अ‍ॅड. विपुल दुशिंग यांचीच नियुक्ती केल्याचे सांगितले आहे.