
प्राचीन काळात कोकणातील कातळावर मानवाने चित्रे रेखाटली, त्या कातळशिल्पांना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला. आता कातळशिल्पांची ओळख इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना इतिहास-नागरिकशास्त्राच्या पाठय़पुस्तकातून होणार आहे.
रत्नागिरी जिह्यातील अनेक गावांमध्ये ही कातळशिल्पे सापडली. या कातळशिल्पांमध्ये विविध प्राणी, भौमेतिक रचना, मनुष्याकृती, चित्रकृती आपल्याला पाहायला मिळतात. या कातळशिल्पांचा युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यामध्ये रत्नागिरी जिह्यातील कशेळी, रूंढेतळी, देवाचेगोठणे, बारसू, देवीहसोळ, जांभरूण, कुडोपी, उक्षी अशा आठ ठिकाणच्या वैशिष्टय़पूर्ण कातळशिल्पांचा समावेश आहे. आज अनेक पर्यटक ही कातळशिल्पे पाहण्यासाठी कोकणात येतात.
सहावीच्या पाठय़पुस्तकात कातळशिल्पांचा समावेश होणे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र पुस्तकात त्रोटक माहिती देण्यात आली आहे. किमान एक पृष्ठ किंवा कातळशिल्पांचा इतिहास सांगणारा एक धडा पुस्तकात समाविष्ट करायला हवा होता. – सतीश लळीत, संशोधक
कातळशिल्पांचा अभ्यासक्रमात समावेश झाला हे चांगले झाले. विद्यार्थ्यांना कातळशिल्पांची तोंडओळख होऊन ते निश्चितच त्यावर विचार करू लागतील.
– सुधीर रिसबुड, संशोधक




























































