
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात घाट संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलला पहिल्याच मुसळधार पावसात धोका निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे गॅबियन वॉलच्या फाउंडेशनखालची माती वाहून गेल्याने भिंतीचा पाया कमकुवत झाला असून भिंत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणावेळी परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले होते. काही ठिकाणी भराव टाकून रस्त्याची उंची वाढवण्यात आली. त्यानंतर घाट आणि महामार्ग सुरक्षित राहावा तसेच दरडी कोसळण्याचा धोका कमी व्हावा म्हणून या ठिकाणी गॅबियन वॉल उभारण्यात आली होती.
परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे-परशुराम परिसरात वारंवार दरडी कोसळतात. या दरडी दळवीत गावाच्या दिशेने येऊन झाडे आणि परिसराचे नुकसान करतात. त्यामुळे गाव आणि मुंबई-गोवा महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी ही गॅबियन वॉल महत्त्वाची मानली जाते. मात्र, पहिल्याच जोरदार पावसात गॅबियन वॉलच्या फाउंडेशनखालची माती वाहून गेली आहे. त्यामुळे भिंतीच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामाच्या दर्जाबाबतही सवाल उपस्थित होत आहेत.
घाट संरक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असताना पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर आणि संबंधित यंत्रणांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.































































