
चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मंगळवारी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीला आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी एम/पश्चिम विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर, दुय्यम अभियंता (रस्ते) अरुण मुंढे, सहाय्यक अभियंता योगेश पारटे या तीन अधिकाऱयांना निलंबन करण्यात आले आहे.
चेंबूर दुर्घटनेची दखल घेत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीचा अहवाल आठ दिवसांत सादर करावा लागणार आहे. यासोबतच समितीने या प्रकरणात तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच अशा घडना वारंवार घडू नये यासाठी शिफारशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रथमदर्शनी निष्काळजीपणा ज्यांच्याकडून झाल्याचे निदर्शनास आले अशा संबंधित अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. यासह संबंधित कंत्राटदाराविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.






























































