
मुंबईत मागील अनेक दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून याला बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील कंत्राटी कामगारांचे अज्ञान कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या कामगारांना वीज पुरवठ्याचे पुरेसे ज्ञान नाही. त्यामुळे वारंवार तांत्रिक बिघाड होऊन विजेचा लपंडाव सुरू असल्याचे बेस्ट प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून बेस्टच्या वीज पुरवठ्याचे भवितव्यच ‘अंधारात’ गेले आहे.
मुंबईतील परळ, लालबाग, गिरगाव, प्रतीक्षानगर, शीव-कोळीवाडा आदी भागांत अनेक दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याचे तीव्र पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील कंत्राटदारांच्या ‘खोगीर’भरतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. पूर्वी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात सात हजारांपर्यंत कायमस्वरूपी कर्मचारी होते. त्यावेळी वीज पुरवठा अखंडितपणे सुरू होता. मात्र गेल्या तीन वर्षांपासून कंत्राटदारांचा शिरकाव झाला आणि वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कंत्राटी कामगारांना बेस्टच्या वीज पुरवठ्याशी संबंधित बारकावे माहीत नाहीत. त्यांना पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्यांच्याकडून जुजबी दुरुस्ती केली जाते. पुन्हा काही तासांनी त्याच ठिकाणी बिघाड दाखवला जातो. शेवटी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना तेथे धाव घेऊन तो बिघाड दुरुस्त करावा लागतो. सध्या विद्युत पुरवठा विभागात केवळ तीन हजार कायमस्वरूपी कर्मचारी उरले असून पुरेशा गाड्या आणि दुरुस्ती साहित्याची वानवा आहे. याचा मोठा परिणाम वीज पुरवठय़ावर दिसून येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वीज पुरवठय़ाच्या प्रश्नावर शिवसेना, मनसे आक्रमक
शीव-प्रतीक्षानगर परिसरात दिवसातून 10 ते 15 वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. खंडित वीज पुरवठा व इतर नागरी समस्यांबाबत शिवसेना आणि मनसेच्या वतीने अविनाश किरवे, विलास अपराध, रूपेश किर्लोस्कर, लवू नर, गणेश शिंदे, गुरुनाथ कापडोस्कर आदी पदाधिकाऱयांनी बुधवारी पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची भेट घेतली. दोन्ही नेते महापौर व पालिका आयुक्तांच्या दालनात अधिकारी वर्गासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.






























































