
भायखळा विधानसभा क्षेत्रातील दारूखाना येथे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरून निष्कासित करण्यात आलेल्या झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करा, अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत केली. त्याबरोबरच भायखळ्यातील पाणीप्रश्न, विजेचा खेळखंडोबा आणि बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही त्यांनी मांडला.
नियम २९३ अन्वये विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर बोलताना जामसुतकर यांनी भायखळ्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. “भायखळा विधानसभा क्षेत्रात दारूखाना ही मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा आहे. तिथे पिढ्यान्पिढ्या लोक राहतात. या रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत; कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा होतो, ड्रेनेज लाईन भरलेल्या आहेत, पर्जन्य जलवाहिन्या नादुरुस्त आहेत, तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, ज्यामुळे रहिवासी त्रस्त आहेत,” असे जामसुतकर म्हणाले.
काही दिवसांपूर्वी पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दारूखाना येथील जवळपास ७५ ते ८० झोपड्यांना निष्कासनाच्या कारवाईची नोटीस दिली होती. त्या प्रश्नी आपण आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रहिवाशांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांची भेट घेतली होती. “त्यानंतरही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी झोपड्यांवर कारवाई केली. प्रत्येकाला पक्के घर देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनाला यामुळे हरताळ फासला गेला आहे,” असे जामसुतकर म्हणाले. राज्य शासनाने दारूखान्यातील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करावे आणि केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून तिथे गृहनिर्माणाची योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी द्या, बीआयटी चाळींचा पुनर्विकास करा
मदनपुरा, माझगाव, डॉकयार्ड रोड तसेच भायखळा पूर्व आणि पश्चिम विभागात अनेक जुन्या व मोडकळीस आलेल्या पागडी आणि उपकरप्राप्त (सेस) इमारती आहेत. त्यांची दुरुस्ती मालकांकडून होत नसल्याने, अनेक इमारतींमध्ये कोणत्याही क्षणी दुर्घटना होऊ शकते; ज्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. भायखळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. ज्या ज्या ठिकाणी ‘बेस्ट’चे (BEST) फॉल्ट होत आहेत, तिथे जास्त क्षमतेच्या केबल्स टाकण्यात याव्यात. भायखळा येथे भंडारवाडा जलाशय आहे, ज्याला ११५ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, तिथे ९२ ते ९४ एमएलडी इतकाच पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित होतो. त्यामुळे संपूर्ण भायखळ्यात कमी दाबाने पाणी येते. परिणामी, भंडारवाडा जलाशयाला पुरेशा पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. सातरस्ता, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल, लव्हलेन, माझगाव-ताडवाडी या भागांत अनेक बीआयटी चाळी आहेत. बीडीडी चाळ आणि अभ्युदय नगरचा ज्याप्रमाणे पुनर्विकास होत आहे, तशाच प्रकारे बीआयटी चाळींच्या पुनर्विकासासाठीही धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी जामसुतकर यांनी केली.





























































