आयव्हीएफ गैरप्रकार, दोषींवर ‘मोक्का’ लावण्यासाठी कायदा; आरोग्यमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील बेकायदा सोनोग्राफी आणि कृत्रिम गर्भधारणा (आयव्हीएफ) केंद्रांवर सरकारने राज्यव्यापी कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर सोनोग्राफी आणि गर्भलिंगनिदानाच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, अशा संघटित स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांविरोधात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यासाठी पुढील अधिवेशनात विधेयक सादर केले जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.

आमदार अबू आझमी यांनी राज्यभरातील अनधिकृत गर्भधारणा केंद्रांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना, राज्यात आयव्हीएफ उपचार आणि सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण अनावश्यकरीत्या वाढत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे आबिटकर यांनी यावेळी मान्य केले.