
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत ‘सैराट’ आणि ‘फॅन्ड्री’सारख्या चित्रपटांनी इतिहास घडवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा एक भव्य आणि प्रेरणादायी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. स्वतंत्र हिंदुस्थानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित ‘खाशाबा’ या चित्रपटाचा अधिकृत टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेला हा भव्य क्रीडापट 1 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या डिजिटल टीझरमध्ये प्रेक्षकांना पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचे भव्य चित्रण, दमदार दृश्यरचना आणि संघर्षाची भावनिक तीव्रता अनुभवायला मिळत आहे. नव्याने स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट एका संघर्षशील कुस्तीपटूची गाथा सांगतो, ज्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि हिंदुस्थानी क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले.
खाशाबा जाधव यांच्या भूमिकेसाठी नवोदित चेहऱ्याची निवड करण्यात आली असून त्याचे नाव लवकरच जाहीर केले जाईल. या चित्रपटात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. संगीत क्षेत्रातील जादूई जोडी अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. त्यामुळे चित्रपटाची गाणी आणि बॅकग्राउंड स्कोअर नक्कीच अंगावर रोमांच उभा करणार यात शंका नाही.
‘धुरंधर’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ अशा सलग यशस्वी चित्रपटांनंतर जिओ स्टुडिओजने या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच 1 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.



























































