
चाक निखळलेली एसटी अर्धा किलोमीटर धावल्याची थरारक घटना वाडा तालुक्यातील नेहरोली परिसरात घडली. हा भयंकर प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्यांनी मोठ्या कौशल्याने गाडी हळूहळू ब्रेक दाबत रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यामुळे ५० प्रवाशांचा जीव बालबाल बचावला आहे. ही बस ठाण्याहून जव्हारकडे जात होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
३८ बस मोडकळीस
जव्हार आगारात एकूण ४८ बस आहेत. त्यातील सुमारे ३८ बस मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. या बस अनेकदा रस्त्यात बंद पडत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड हा डोंगराळ व घाटमाथ्याचा परिसर असल्याने येथे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुस्थितीतील आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम बस उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी करत आहेत. मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
डेपो व्यवस्थापकांची उर्मट उत्तरे
जव्हार आगाराच्या सहाय्यक व्यवस्थापक उषा घुगे यांना घटनेबाबत विचारणा केली असता त्यांनी उर्मट उत्तरे दिली. त्या म्हणाल्या माणसाचा काही भरवसा नाही. एसटी बसही माणसानेच बनवल्या आहेत. त्याचाही काही भरवसा नाही, असे सांगत जबाबदारी झटकली. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.






























































