
झारखंडमधील पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील पोटका ब्लॉकमध्ये ‘सेरेब्रल मलेरिया’चा (मेंदूचा मलेरिया) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत आणखी 9 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे एका आठवड्यात या गंभीर आजाराच्या रुग्णांची संख्या आता 150 वर पोहोचली आहे. या वाढत्या आकड्यांमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून परिस्थिती हाताळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, पोटका ब्लॉकमध्ये 24 जूनपासून आतापर्यंत सुमारे 3 हजार संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदर आणि हितबासा या गावांमधे या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे. सध्या 9 रुग्णांवर स्थानिक पोटका रुग्णालयात तर 45 रुग्णांवर जमशेदपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत या प्राणघातक आजारामुळे चार निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
‘सेरेब्रल मलेरिया’ हा प्लाझमोडियम फाल्सीपेरम (Plasmodium Falciparum) या डासांमुळे होणारा एक अत्यंत घातक आणि न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये रुग्णाचा मेंदू निकामी होण्याचा किंवा तो कोमात जाण्याचा तीव्र धोका असतो. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय पथके बाधित गावांमध्ये तळ ठोकून आहेत. नागरिकांना औषधोपचार पुरवणे, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे आणि डासदाण्यांचे वाटप करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, ज्या गावांमध्ये तापाचे रुग्ण जास्त आहेत, तिथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक संशयित रुग्णाची त्वरित तपासणी करून, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास लगेच उपचार सुरू केले जातील. तसेच सर्व समुदाय आरोग्य केंद्रांवर टेस्टिंग किट्स आणि मलेरियाविरोधी औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.



























































